गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील मोताळा (mothala) तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोताळा तालुक्यातील गिरोली (giroli) गावात विद्युत खांबाचे काम करण्यासाठी आलेल्या विद्युत कर्मचाऱ्याने स्वतः विद्युत खांबावर न चढता गावातील लक्ष्मण चव्हाण या व्यक्तीला खांबावर चढवले आणि निष्काळजीपणे विद्युत प्रवाह सुरू केला. त्यामुळे विद्युत शॉक लागून या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती समजली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर गावकरी संतप्त झाले आहेत. संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निष्काळजीपणा करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. मृत्यू पावलेल्या व्यक्तीला मदत मिळाली, यासाठी गावकऱ्यांनी मृतदेह थेट जिल्हा महावितरणच्या कार्यालयात ठेवला आहे. जोपर्यंत मृतकाच्या कुटुंबाला मदत मिळत नाही आणि निष्काळजीपणा करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याच पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारवाई करण्याच्या आश्वासनाने अखेर ग्रामस्थांनी प्रेत उचलून नेले. यावेळी मात्र कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता.
विद्युत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. स्वतः विद्युत खांबावर न चढता गावातील व्यक्तीला खांबावर चढवले होते. त्यामुळं गावकऱ्यांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयात ठेवला होता. महाराष्ट्रात आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अधिकाऱ्यांवरती कारवाई सुध्दा झाली आहे. आता कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.