बुलडाणा : सिंदखेडराजा (Sindkhedaraja) तालुक्यातील चोरपांग्रा गावात सध्या भर पावसाळयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. गावाला सतरा दिवसांनंतरही नळाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत (Gram Panchayat) प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झालाय. तत्काळ पाणी मिळाले नाही, तर ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा (Handa Morcha) काढण्याचा इशारा महिलांनी दिलाय. गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. याला गावातील पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप महिलांनी केलाय.
बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांग्रा गावासाठी शासनाने यापूर्वीच तब्बल 23 लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पूर्ण केलीय. त्यामध्ये विहीर, पाइपलाइन, नळ, पाण्याची टाकीसह सर्व सुविधा दिल्या. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केलीय. विहिरीला मुबलक पाणी असताना सुद्धा गावाला पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही.
नागरिकांना गावाबाहेर जाऊन विहिरीतून पाणी काढून डोक्यावर पाणी आणावे लागते. यामुळे शेतीची कामे अडली. मजुरांना शेतात कामाला जाता येत नाही. शाळकरी मुलांना शाळा सोडून पाणी आणावे लागते. अशा गंभीर समस्या पाणी नसल्याने निर्माण झाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. काहीही करा पण, गावातील पाण्याची समस्या सोडवा, अशी आर्त हाक महिला देत आहेत.
पाणी ही मूलभूत गरज. पण, अजूनही काही गावांत पाण्याची समस्या आहे. सरकारकडून निधी येतो. त्याचा वापरही होतो. पण, योग्य नियोजनाअभावी योजनेचा बोजवारा उडतो. गावकरी ते राव न करी म्हणतात. पण, गावातील लोकप्रतिनिधी सक्षम नसले, तर गावातील योजनेचा बोजवारा कसा उडतो, याचे हे उदाहरण.