बुलढाण्यात पुतळ्यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. बुलढाण्याच्या विकासावर मुख्यमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तर आमदार संजय गायकवाड यांनी सपकाळ यांच्यावर खोचक टीका केली. “माजी आमदार हा निजामाची वैचारिक औलाद आहे”, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला. “बुलढाणा शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी. कारण बुलढाणा शहरात उभारण्यात आलेले बहुतांश महापुरुषांचे पुतळे हे प्लॅस्टिक फायबर तत्सम स्वरुपाच्या साहित्यापासून तयार झालेले आहेत. हे शासकीय नियमानुसार नसून संकेतांच्या अनुषंगाने सर्व पुतळे ब्राँझ धातूचे मजबूत, भरीव आणि दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपाचे राहतील, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आर्थिक तरतूद करूनच जिल्हा दौऱ्यावर यावे”, अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय. बुलढाणा येथे पुतळ्यांच्या अनावरणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे.
बुलढाणा शहरात विविध ठिकाणी मोठ्या संख्येने उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. “महापुरुषांचे पुतळे मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे असावेत; ऊन, वारा, पाऊस यांचा कुठलाच दुष्परिणाम होऊ नये, तथा तकलादु आणि पोकळ नसावेत”, असे काँग्रेसचे माजी आमदार हर्धवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. “या विकासाच्या कामाची श्वेत पत्रिका काढावी आणि जाहीर करावी”, अशी मागणी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. “या माजी आमदाराला आता पुतळ्याचा कुठून पुळका आलाय? दुसरं असं की बुलढण्यात विकास झाला नाही, असा आरोप करणाऱ्या तू कधी आमदार असताना एकदा तरी विकास केला का? तुला तर विकास दिसणार नाही. कारण तुझा विकासाचा काहीही संबंध नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“हा तर आमदारकी भेटल्यानंतर दिल्ली, बिहार फिरणारा होता. त्याला विकास काय माहीत? विकास काय आहे हे बुलढाणेकरच सांगतात. विकास नसेल तर तू राह ना उभा विधानसभेच्या निवडणुकीत. तुला दाखवून देतील बुलढाणेकर, आणि श्वेतपत्रिका तू आणि सर्व काँग्रेसवाले यासमोर मी दाखवून देतो, मी विकास किती केला तो”, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.