बुलढाणा : शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. त्याला उत्तर देताना संजय गायकवाड बोलत होते. संजय गायकवाड म्हणाले, जे बोलले त्यांना माझा सवाल आहे की, जेव्हा आम्ही बाळासाहेब सोबत काम करत होतो तेव्हा तुझी गोधडीत झोपले होते. तेव्हा तुमचा राजकीय जन्म पण नव्हता. तुमच्या राजकीय जन्मापासून आम्ही रक्त सांडले. तुळशीपत्र घरावर ठेऊन बाळासाहेबांसोबत पक्ष वाढविला. तुम्ही तेव्हा होता कुठं?, असा सवालही त्यांनी विचारला.
बाळासाहेब यांनी जो शिवसैनिक घडविला तो सच्चा शिवसैनिक आम्ही आहोत. जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबतचे आहेत. आता कडवट म्हणणारे कधीच काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करू शकत नाही, अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली.
जो बाळासाहेबांच्या विचारांचा असेल तोच भगव्या झेंड्याखाली काम करेल. उगाच निष्ठेचा आव आणू नये. हे हुकुमशाही सरकार नाही. धाडसाने निर्णय घेणारे सरकार आहे. म्हणून या देशात भाजपासोबत आहोत. ही मूठभरांची संख्या नाही तर अथांग सागर आहे. या सागराने आता एक एक राज्य व्यापायला सुरुवात केलीय, असंही संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.
पण ज्या लोकांसोबत तुम्ही गेला त्यांनी 370 कलम हटवण्याचा निर्णय कधी घेतला का. कधी त्यांनी राम मंदिरासाठी पुढाकार घेतला का. हे सरकार धाडसाने काम करत आहे. आम्ही मूठभर नाही तर तुम्ही येणाऱ्या काळात मूठभर शिल्लक राहणार आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला.