बुलढाणा : अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात मार्जीन असते. याचा फायदा औषध विक्रेत्यांना होता. त्यातला काही वाटा वरिष्ठ मागत असल्यावरून हा वाद सुरू झाला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेकडून पैसे मागतात. असा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पीए आणि ओएसडी औषध विक्रेत्यांकडे प्रचंड प्रमाणात पैसे मागतात. असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून करण्यात आला आहे.
आरोपांचे पत्र या संघटनेच्या राज्यसचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. या ना त्या कारणाने औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाई संदर्भात निकाल देण्यासाठी बराच उशीर अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईवर निकाल देण्यासाठी आणि छोट्या छोट्या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पी. ए. डॉ. विशाल राठोड त्याचबरोबर OSD संपत डावखर आणि चेतन करोडीदेव मोठ्या प्रमाणात औषध विक्रेत्यांकडे पैसे मागतात. असा गंभीर आरोप या संघटनेकडून लावण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्रालयीन कार्यालय हे भ्रष्टालय झाल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय.
गेल्या सरकारमध्ये संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पुन्हा आरोप झाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकरण कसं हाताळतात. यावर संजय राऊत यांचं भवितव्य अवलंबून आहे. कारण संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.