बुलढाणा : खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. त्यावर संजय राऊत यांना पैसे देऊन उद्धव ठाकरे यांनी फक्त बोलायला ठेवले आहे. असा पलटवार बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटातील आठ ते नऊ आमदार आणि दोन खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडून या निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करण्यात आली होती. यावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन भाटगिरी करण्याकरता ठेवलेला आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. संजय राऊत यांनी आता खासदारांना 100 कोटी दिल्याचा आरोप केल्यानंतर संजय राऊत यांचे गणित कच्चं दिसत असल्याचं सांगत संजय राऊत यांनी आमच्यावर ३०० खोक्यांचा आरोप केला पाहिजे होता. कारण की एक खासदार हा सहा आमदारांचे प्रतिनिधित्व करते असं म्हणत संजय राऊत यांची खासदार प्रतापराव जाधव यांनी खिल्ली उडवली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे म्हणत होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच आता आरोप केले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावं ते सकाळी खरं बोलत होते का संध्याकाळी खोटे बोलत होते ? खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना हा सवाल केला.
एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडलेत. म्हणून त्यांच्यावर आज लाचारीचे दिवस आलेत. खासदार प्रतापराव जाधव यांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर असाही घणाघात केला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे असल्यामुळे गाव पातळीवरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्या शिवसेनेचेचं. आता त्यांना ठाकरे गटाकडे जायचं असेल तर इकडून तिकडे जावं लागेल, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. ते शिवसेनेचीच असल्याचं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखांवर दावा केला आहे.