बुलढाणाः शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत होत आहे. तुपकर हे बुलढाण्यात पोहचल्यावरसुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडत आणि अंगावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी तुपकर यांनी जनसंपर्क कार्यालयावर पोहचताच त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना तुपकर यांनी संबोधित केले. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी बोलताना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
गुलाबराव पाटील यांनी तूपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचा तूपकार जेलबाहेर आल्यावर चांगलाच समाचार घेतला आहे.
गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, गुलाबराव पाटील तुमचे घर काचाचे असून, गुवाहाटीला शेण खायला गेले होते का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
तर ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केली आहे.
तुम्ही ठाकरे यांचे झाला नाहीत आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका, योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला चांगले उत्तर देऊ अशी खरमरीत टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे सरपंच झाले आहेत, ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, आपले मुख्यमंत्री तर ठाणेदारलाही फोन लावतात.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची गरिमा घालविली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. पोलिसांनी आमच्यावर केलेला लाठीमार हा बॉसच्या सांगण्यावरून केला, असा आरोप करत तुपकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही जोरदार प्रहार केला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केल्यानंतर जेलात असलेले रविकांत तुपकर आज अकोला कारागृहातून जामीनावर बाहेर आले आहेत.
जेल बाहेर आल्यानंतर रविकांत तुपकर यांची जीभ चांगलीच घसरली असल्याचे दिसून आले. “शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लाठी हल्ला करणाऱ्या पुढार्यांच्या लेकरांच्या तोंडात किडे पडतील, यांची मुलं चांगली निघणार नाहीत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
अकोला कारागृहातून आपल्या कार्यकर्त्यांसह जामीनावर बाहेर आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेगावात गजानन महाराजांचे दर्शन घेतले. तर त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांची या जेलवारीनंतर जीभ घसरली असल्याचं पाहायला मिळतंय.