बुलढाणा : राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर आता सकारात्मक आणि नकारात्मक अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून या अर्थसंकल्पाचे समर्थन करण्यात येत असले तरी विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाचे विवेचन करताना म्हटले आहे की, स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे असल्याचेच म्हटले आहे.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्यांना लाथा अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः पिकावर नांगर फिरवला आहे. तरीही शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कोणतीच योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली नाही.
सोयाबीन-कापसाला उत्पादन खर्च भरून निघेल एव्हढाही भाव खाजगी बाजारात नाही. त्यामुळे आज ७० ते ८० टक्के सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.
सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचे विशेष पॅकेज घोषित करणे गरजेचे होते पण तसे या सरकारकडून झाले नाही. जर शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे आहे.
शेतीला पूर्ण वेळ वीज मिळण्याकरिता व जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी शेतीला कंपाउंड करण्यासाठी भरीव तरतूद करणे गरजेचे होते.
तसेच 2022 खरीप हंगामातील घोषणा केलेली अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. अद्याप अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत.
त्यामुळे मागचे सोडून द्यायचे अन् पुढच्या घोषणा करत सुटायच्या असं म्हणत आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.
तसेच संत्रा प्रकिया केंद्राची सरकारने घोषणा केली पण अशीच घोषणा 2015 साली टेक्सटाईल पार्कच्या बाबतीतही करण्यात आली होती.
तर किती टेक्सटाईल पार्क उभे राहिले…? असा प्रश्न उपस्थित करून ‘लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही’, असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला आहे.
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शहरी मतदारांना आकर्षित करणारा व स्वप्नांच्या दुनियेत फिरवणारा हा अर्थसंकल्प असल्याची खोचक टीकाही तुपकर यांनी केली आहे.