बुलढाणा : सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. पण, त्यापैकी काही योजना गरजूंपर्यंत पोहचत नसल्याचं चित्र आहे. सरकार शेवटच्या माणसासाठी काम करतं, असं सांगितलं जातं. मात्र, शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचत नसल्याचं दिसून येतं. अशीच काहीशी गोष्ट एका आजीबाईची झाली. तिनं आपल्या आयुष्याची ७० वर्षे घालवली. तरीही तिला एका महत्त्वाच्या शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळं ती आपली खंत व्यक्त करते. आज आमदार गावात आले. त्यांच्याजवळ तिने ही खंत बोलून दाखवली. आमदारानं कार्यकर्त्यांना आजीबाईची मागणी पूर्ण करा, असं सांगितलं. कार्यकर्ते कितीपत जोमाने कामाला लागतात आणि आजीबाईची मागणी पूर्ण होते, हे पाहावं लागेल.
घरकुल सर्वांना मिळालं पाहिजे, असं पंतप्रधानांचं स्वप्न आहे. पण, काहींच्या नशिबी थट्टाच येते. काही जणांना वडील, मुलाच्या नावानं एकाचं कुटुंबात दोन-दोन घरकुल मिळतात. तर काही जणांपर्यंत ही योजना पोहचतच नाही. अशी काहीसी कथा एका आजीबाईची आहे. ही आजीबाई घरकुलाची मागणी करत आहे. आयुष्याची ७० वर्षे काढली. पण, अद्याप घरकुल मिळालं नाही. आता शेवटी म्हसणात जाण्याची वेळ आली. म्हणजे स्मशानघाटावर जाण्याची वेळ आली. मात्र, एक शेवटची इच्छा आजीबाईची आहे ती म्हणजे तिला घरकुल मिळालं पाहिजे. यासाठी तिची धडपड पाहायला मिळाली.
बुलढाणा मतदार संघाचे आमदार आज सावळा येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी गेले होते. तिथं 70 वर्षीय आजीने आमदार संजय गायकवाड यांना अडविले. यावेळी कौशल्यबाई वखरे असं या आजीबाईचं नाव. त्यांनी आपल्याला घरकुल नसून ते द्यावे, अशी विनंती केली. आमदार संजय गायकवाड यांना हात जोडले.
माझं वय म्हसणात जायचं हाय. मी दोन दिवस घरकुलात राहिले तरी समाधान आहे. लोकांचे तीन-तीन वेळा घरकूल आले. पण माझे नाही. यावेळी आमदार गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्याला तत्काळ सांगून आजीच्या घरकुल प्रश्न मार्गी लावायला सांगितला. आजीला 500 रुपयांची नोट खर्चायला दिली आणि काढता पाय घेतला.