बुलडाणा – मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा केला. तसाच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी केला, असं गायकवाड म्हणाले. शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याची तुलना गायकवाड यांनी शिंदे यांच्या बंडाशी केली. गायकवाड यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय. संजय गायकवाड म्हणाले. सरकारच्या वतीनं शिवाजी महाराज यांचा अपमान असा विषय होऊ शकत नाही. शिवरायांच्या आदर्शावर चालणारं असं हे सरकार आहे. शिवाजी महाराज यांच्याबदद्ल काही लोकांना माहिती नाही. अशा लोकांच्या तोंडून काही गोष्टी बाहेर पडतात.
त्यानंतर ते माफीदेखील मागतात. पण, अशाप्रकारची विधान त्यांनी करू नये. अशी वादग्रस्त विधान करायला सरकार किंवा एकनाथ शिंदे त्यांना सांगत नाही. ती त्यांचे वैयक्तिक मतं असतात.
महाराष्ट्राची जाण असायला पाहिजे, यात दुमत नाही. पण, एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाहीत. शिवाजी महाराज यांनी वेळप्रसंगी गनिमी काव्याचा उपयोग केला आहे. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी वापरला आहे.
याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले, गनिमी कावा मांडून एखादा व्यक्ती आपल्या हिंदुत्वासाठी भांडत असेल, तो अॅम्बुलन्समध्ये बसून गेला. सीमा पार केली. त्यात शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं. तर त्यात शिवाजी महाराज यांची कमीपणा असण्याची भूमिका असू शकत नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराज यांनी केलेली आहे.