बुलढाणा : रस्त्याने जाताना कोण कधी वेगाने येऊन जाईल याचा काही नेम नसतो. वाहतूक पोलिसांचा धाक राहिला की नाही, असा प्रश्न या दुचाकी वेगाने चालवणाऱ्यांच्या बाबतीत दिसून येतो. अशीच एक घटना बुलढाण्यात उघडकीस आली. बबली-बंटी हे आधी चेन स्नॅचिंगचा सराव करत होते. त्यानंतर त्यांनी चोरी करण्याची योजना तयार केली. तीन-चार ठिकाणी चेन स्नचिंग केल्यानंतर या चोरांची हिंमत बळावली. पण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून पोलिसांनी सापळा रचला. याता दोघेही पोलिसांच्या ताब्यात आले.
राम मंदिरासमोर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे. आरोपीसोबत त्याची पत्नी या चोरीमध्ये सहभागी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारेच समोर आले. त्यामुळे बंटीसोबत बबलीलाही पोलिसांनी अटक केली.
दोघांनाही १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील १५ दिवसांत तीन ते चार वेगवेगळ्या चेन स्नॅचिंगच्या घटना बुलढाणा शहरात घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान वृद्ध ताराबाई टावरी यांच्या गळ्यातील चेन तोडून बाईकस्वार फरार झाला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर युवक स्पष्ट दिसून आला होता. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी आरोपी हा एका महिलेसोबत खूप बारीक स्नॅचिंगची रंगीत तालीम करतानाही दिसून आले होते.
या बबली बंटीमुळे चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. नागरिक दहशतीत होते. त्यामुळे पोलीसही कामाला लागले. तक्रारी वाढू लागल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला. त्यानंतर आरोपींचा पत्ता लागला.
चोर चोरी करण्यासाठी बऱ्याच युक्त्या करतात. पण, पोलीस यंत्रणा शोध लावतेच. बऱ्याच घटनांमध्ये आरोपी पकडले जातात. काही मोजक्या घटना शोधण्यात पोलिसांना यश येत नाही. त्यामुळे चोरांना पोलिसांचा धाक वाटला पाहिजे.