गणेश सोळंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : तुम्ही 50 खोके घ्या किंवा 100 घ्या. मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या. अशाप्रकारे सोयाबीन सोंगताना चर्चा करतानाचा शेतकऱ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या राज्यात “खोक्या”ची जोरदार चर्चा सुरूय. महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी शिवसेनेतील शिंदे गटाचे 40 आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले.
पळून गेलेल्या या 40 आमदारांनी 50 खोके घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी “गद्दारी” केली, असा आरोपही शिवसैनिकाकडून त्यांच्यावर वारंवार होत आहे.
दुसरीकडे आम्हाला “गद्दार” म्हणू नका, आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप लावू नका, अशी तळमळीची विनंती शिंदे गटातील आमदार आपल्या प्रत्येक कार्यक्रमात करत आहेत.
मात्र विरोधी पक्ष तर सोडाच, सामान्य जनता सुद्धा त्यांना “गद्दार” आणि “50 खोके , एकदम ओके” असे हिणवत आहे. 40 आमदार तसेच शिंदे गटात नंतर सामील झालेल्या 12 खासदारांनी आपल्या सोशल मीडियावरील कमेंट बॉक्स बंद करून टाकले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. नेटकरी त्यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कमेंट करत आहेत.
दुसरीकडे सध्या सोयाबीन सोंगनीची लगबग सुरू आहे. खाद्य तेलाचे भाव उतरू लागलेत. याचा अर्थ तेल माफियांनी सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी हा रचलेला डाव आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
अशातच बुलढाणा तालुक्यातील शिरपूर या गावातील शेतकरी मधुकर वाघमारे, दिनकर वाघमारे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी सोयाबीनची सोंगनी करत आहेत.
राजकीय नेत्यांना टोमणे मारत असल्याचे दिसत आहे. तुम्ही 50 खोके घ्या किंवा 100 खोके घ्या, मात्र आम्हा शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव द्या, अशी विनंती देखील ते सरकारला करत आहेत.