रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, दोन दिवसात गोड बातमी मिळणार; भरत गोगावलेंनी दिले संकेत

| Updated on: Jan 29, 2025 | 10:57 PM

या भेटीनंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटल्याचे संकेत दिले.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, दोन दिवसात गोड बातमी मिळणार; भरत गोगावलेंनी दिले संकेत
Follow us on

Bharat Gogawale on Raigad Guardian Minister : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 37 जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावे जाहीर करण्यात आली. आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद संपता संपत नसल्याचे दिसत आहे. आता या पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला आहे. नुकतंच मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक विधान केले.

महाराष्ट्राची पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावरुन भरत गोगावले हे नाराज झाले. त्यानंतर गोगावले समर्थकांनी जोरदार आंदोलन केले. यानंतर या नियुक्तीला स्थगिती देणार पत्रक काढण्यात आले. यानंतर आज अचानक भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटल्याचे संकेत दिले.

“मी याबद्दल आता काहीही सांगणार नाही. आमचे नेते मंडळी दोन दिवसात याबद्दल ठरवतील. दोन दिवसात निश्चित निर्णय होईल. नक्की काहीतरी चांगलं होईल. निश्चितच सकारात्मक बातमी मिळेल”, असे भरत गोगावले म्हणाले. यानंत त्यांना पुन्हा एकदा तुम्ही पालकमंत्री झालात असे समाजायचे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “असे उलटे काही विचारू नको. जरा थांब, घाई कशाला करतो आहे… सकारात्मक बातमी मिळेल, असे वाटते आहे. मी पालकमंत्रीपदाचा विषय नेत्यांवर सोपावला आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा मुख्यमंत्री दिल्लीवरुन आल्यानंतर सुटेल. दोन दिवसात गोड बातमी मिळेल. सर्व जनतेचे म्हणणं आहे”, असे म्हटले.

कोणाला कोणते पालकमंत्रीपद?

दरम्यान नुकत्याच जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीनुसार, मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेंकडे देण्यात आले आहे. तर मुंबई उपनगराचे पालकत्व दोघांकडे असणार आहे. आशिष शेलार हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. त्यासोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्याकडे असणार आहे. तसेच नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार असणार आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे.