नाशिक : वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं काल राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरात महावितरणच्या कार्यालयाला भाजप नेत्यांनी टाळं ठोकलं. नाशिकमध्येही भाजप आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं होतं. त्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.(case filed against BJP MLA Devyani Farande and 25 others )
नाशिकमध्ये भाजपचं आंदोलन सुरु असताना पोलिस कर्मचारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली होती. त्याचाच ठपका ठेवत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीच फिर्यादी होत सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून वाढील वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही पद्धतीन आणि सनदशील मार्गानं काम करत आहेत. सरकारला वारंवार विनंती केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना निवेदन दिलं. पण सरकार ऐकायला तयार नाही. आज ऊर्जा खात्याकडून 79 लाख नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लाईट कापली गेली तर 4 कोटी लोक अंधारात येणार आहेत. अशावेळी आम्ही वीज बिलमाफीसाठी आंदोलन केलं तर महाविकास आघाडी सरकार पोलिसांना पुढं करत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करुन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी सरकारचं काम अतिशय निर्लज्जपणे आणि निर्ढावलेपणाने सुरु आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाही काही घेणदेणं नाही, अशा शब्दात आमदार देवयानी फरांदे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात शुक्रवारी भाजपनं संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन केलं. महाविकास आघाडी सरकारचा 72 लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय म्हणजे ही मोगलाई आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आधी 100 युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झालं?, वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही, तर मग ही लोकं पैसे कसे भरणार? असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपनं शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं. त्यावेळी नागपूर, रत्नागिरी, जळगाव, मुंबई, ठाणे, जामनेर, यवतमाळ, परभणी अशा अनेक ठिकाणी भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं.
संबंधित बातम्या :
भाजपनं रान उठवलं, ऊर्जा मंत्री म्हणतात, चुकलं तर माफ करा पण..!
5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक
case filed against BJP MLA Devyani Farande and 25 others