मुंडेंच्या तक्रारीनंतर मनोज जरांगे पाटील अडचणीत, ते प्रकरण भोवलं, गुन्हा दाखल

| Updated on: Jan 07, 2025 | 7:12 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून, आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंडेंच्या तक्रारीनंतर मनोज जरांगे पाटील अडचणीत, ते प्रकरण भोवलं, गुन्हा दाखल
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी  राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत, या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत त्यांनी अनेकदा प्रशासन व्यवस्था आणि सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी एका मोर्चामध्ये बोलताना मंत्री धनंजय  मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्त्यव केलं होतं. त्यामुळे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला. या प्रकरणात त्यांच्यावर पहिला गुन्हा हा बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तालूर जिल्ह्यातल्या किनगाव पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे.

किनगाव पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चार तारखेच्या जाहीर सभेत त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे, दरम्यान या तक्रारीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे.  विशिष्ट समाज आणि मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे,  स्थानिक नेते किशोर मुंडे यांनी याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आता गुन्हा दाखल झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.