मोठी बातमी! पूजा खेडकर प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल, समिती नेमली, नियुक्तीवर तपास होणार

| Updated on: Jul 11, 2024 | 9:04 PM

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणारी बातमी समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर करण्यात आलेल्या आरोपांनंतर आता त्यांच्या नियुक्तीबाबत थेट केंद्र सरकारकडून चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! पूजा खेडकर प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल, समिती नेमली, नियुक्तीवर तपास होणार
पूजा खेडकर प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल
Follow us on

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवरुन वातावरण तापल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल तपास केला जाणार आहे. पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांवर तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती खेडेकर यांच्याबाबत दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. पूजा यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबतची पडताळणी ही समिती करणार आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्यावरील आरोप खरे की खोटे? याचा थेट सोक्षमोक्ष लागणार आहे.

पूजा खेडकर यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई

पूजा खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार पूजा या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती आणि नारिंगी रंगाचा दिवा लावला होता. पोलिसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून पोलिसांनी कलम १७७ अंतर्गत कारवाई करायचं ठरवलंय. त्यासाठी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर गेले होते. यावेळी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला.

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना वॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत MH -12 AR 7000 क्रमांकाच्या या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे, असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करण्यास सांगण्यात आलंय.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीत वॉट्सअ‍ॅप चॅटसह ताबा मारलेल्या केबिनचे फोटो

दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या तक्रारीचा अहवाल अप्पर सचिवांना पाठवला होता. 25 पानी अहवालात पूजा खेडकर यांनी केलेल्या डिमांडचा पाढा वाचला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पूजा खेडकर यांची वाशीममध्ये बदली करण्यात आली होती. या 25 पानी अहवालात पूजा खेडकरांच्या वॉट्सअ‍ॅप चॅटसह ताबा मारलेल्या केबिनचे फोटो देखील होते.