मध्य रेल्वेच्या भुसावळ येथे मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेने अलिकडे पश्चिम रेल्वेच्या पालघर यार्डात मालगाडी घसल्याच्या घटनेच्या स्मृती जागृत झाल्या आहेत. सकाळी घडलेल्या या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. यात रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जानेवारी 2024 ते 16 जुलैपर्यंत ही पाचवी घसरगुड्डीची घटना असल्याचे म्हटले जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ यार्डात मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने मुंबई,नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
मुख्य यार्डातून मेन लाईनवरून यार्डात प्रवेश करताना मालगाडीच्या 58 डब्यांपैकी दोन डब्यांचे आठ चाकं ( ट्रॉली ) सकाळच्या सुमारास रेल्वे रुळावरून घसरली. ही घटना नवीन गुड्स शेडजवळ घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळाचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटना कळताच रेल्वेची एटीआर गाडी घटनास्थळावर दाखल झाली. आणि बचाव दलाने काम सुरु केले आहे. संबंधित विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मेन लाईन मोकळी केली.
अपघाग्रस्त मालगाडीचे दोन्ही डबे रेल्वे रुळावर पुन्हा चढविण्यात आले आणि त्या दोनडब्यांना जोडून पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच परत मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने गडबड झाली. मालगाडीच्या दोन डब्यांना जोडून मालगाडी 58 डब्यांसह सहा ते सात तासामध्ये जोडण्यात यश आले. अपघाताचे नेमके कारण काय याचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. ही घटना मुख्य यार्डात घडल्याने मुंबई, नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशाच प्रकारे 28 मे रोजी पश्चिम रेल्वेच्या हद्दीत पालघर यार्डात मालगाडीचे सहा डबे रुळांवरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अनेक तासांसाठी विस्कळीत झाली होती. या अपघातात देखील मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल वाहून नेत असताना अपघात घडला होतो.