मुंबई : महिलांना आपल्या तान्हुल्यासह रेल्वे प्रवास करतानाची होणारी अडचण पाहून मध्य रेल्वेने आपल्या लांबपलल्याच्या टर्मिनसवर स्तनपान कक्षांची सुविधा निर्माण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांनंतर आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, पनवेल, ठाणे आणि कल्याण सारख्या गर्दीच्या टर्मिनसवर मध्य रेल्वे स्तनपान कक्षांची उभारणी करणार आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी मातांसाठी स्तनपान कक्षांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे.
एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल, परळ, दादर आणि नेहरुनगर बस स्थानकात मातांसाठी स्तनपान कक्षांची उभारणी केली आहे. आता त्याच धर्तीवक मध्य रेल्वेने लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या गर्दीच्या सीएसएमटी, पनवेल आणि ठाण्यात स्तनपान कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिला मातांना आपल्या तान्हुल्यासह प्रवास करताना या स्तनपान कक्षांची मदत मिळणार आहे. हे स्तनपान कक्ष अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक असे असणार आहेत.
मध्य रेल्वेने लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवर एकूण 13 स्तनपान कक्षांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानकावर तीन, लोकमान्य टिळक टर्मिनसवर तीन, ठाण्यात दोन, कल्याण, पनवेल आणि लोणावळ्यात दोन असे एकूण 13 कक्ष (पॉड्स) बसवण्यात येणार आहेत. या स्तनपान कक्षांची सुविधा विनामूल्य असणार आहे. प्रवासादरम्यान महिलांना आपल्या तान्हुल्यांना सुरक्षितपणे स्तनपान करता यावे, यासाठी स्तनपान कक्षां उभारण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.
सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत. त्यामुळे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने एसटी महामंडळाला एकूण 17 ठिकाणांवर ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत. या 17 हिरकणूी कक्षांपैकी एसटी महामंडळा्च्या पाच बस स्थानकापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बस स्थानक या तीन बस स्थानकावर हिरकणी कक्षांची उभारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.