मुंबई : महाराष्ट्रात पुढील 15 दिवसात प्रचंड राजकीय उलथापालथ होणार असून राज्यातील सरकार डळमळीत होणार. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार, शिंदे-भाजप सरकार कोसळणार असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. राऊत यांचा एक दावा खरा ठरू शकतो तर दुसरा दावा खोटा, अशा आशयाचं वक्तव्य भुजबळांनी केलंय. राज्यात मुख्यमंत्री बदलतील अशी काही स्थिती नाही, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर हा संपूर्ण खेळ अवलंबून आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. भाजप-शिंदे सरकारवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं बारीक लक्ष आहे. त्यातच शरद पवार आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलंय.
संजय राऊत यांचा दावा अभ्यासातून आला असेल असा अंदाज आधी भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ संजय राऊत आतील गोटात काम करतात. दिल्लीत असतात. संपादक आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल पण माझ्याकडे तर माहिती नाही. मुख्यमंत्री बदलणार वगैरे अशी परिस्थिती नाही…
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी राजकीय गणितं अवलंबून आहेत, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं. ते म्हणाले, ‘ १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. शिंदे साहेब त्यात आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे?
दुसरं म्हणजे, निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेलं तरी सरकार हे 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचंच राहील.मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सलगी होणार अशा जोरदार चर्चा आहेत. तर अजितदांदाच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर्सही काही ठिकाणी झळकवण्यात आले. अजित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची इच्छा बोलून दाखवली. यावरून छगन भुजबळ यांनी मोठी मिश्किल प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, ‘ अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी एक तर मुख्यमंत्री पद रिक्त पाहिजे. नंतर संबंधित आमदारांचा सपोर्ट लागतो. ते अनेक वर्षात राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं सांगितलं तर काही चूक नाही. माध्यमांच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलंय, त्यामुळे ते साहजिक आहे..
याविषयी बोलताना छगन भुजबळ यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘ मी दुसऱ्यांदा महापौर झालो. एप्रिल महिन्यात जातो. बदलतो. त्याच्या आदल्या दिवशी प्रकाश अकोलकर माझ्याकडे आले. त्यांनी मला विचारलं, तुम्ही आता निवृत्त होणार. तुम्ही आता विरोधी पक्ष नेता होणार का.. असं विचारलं. मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंनी केलं तर मी विरोधी पक्ष नेताच काय राष्ट्रपती व्हायलाही तयार आहे… हे माझं उत्तर होतं.
येत्या २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार की नाही, हे मी आताच कसं सांगू, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. संजय यांनी यावरून प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी तुटणार नाही अन् फुटणारही नाही. शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं राऊत म्हणाले. याउलट राज्यातील सरकारच जास्त दिवस राहणार नाही. फडणवीस यांना विचारा. भाजपलाच हे सरकार नकोय. जितके दिवस सत्तेत राहतील, तितकं भाजपचं नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री बदलणं म्हणजे सरकार जाणं असंच आहे, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.