मुंबई : विधानसभा अध्यक्ष यांनी काल विधानभवनाच्या प्रागंणात संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याबाबतचा मुद्दा विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. यावरून सभागृहात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार कपिल पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती यांना फक्त सभागृह चालवण्यापुरतेच अधिकार आहेत का ? असा सवाल केला. तसेच, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कस्टडीत ठेवण्याइतके आपले अध्यक्ष पावरफुल आहेत, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरात संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला. याला विधान परिषदेतील आमदारांनी आक्षेप घेतला. तसेच उपसभापतींच्या अधिकारावर गदा आणली जात आहे का ? असे सवाल उपस्थित केले. सरकारच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चहापान किंवा जेवण असे कार्यक्रम होत होते. पण, माझ्या आतापर्यतच्या काळात असा संगीत कार्यक्रम विधिमंडळाच्या आवारात झालेला पाहिलेला नाही असे सांगितले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही त्याला दुजोरा दिला. नागपूर विधानभवनात किंवा मुंबई विधानभवनात असे कार्यक्रम कधीही झाले नाहीत. मी आतापर्यंत चहापान पाहिलेत, जेवण पाहिलेत किंवा कुठेतरी व्याख्यान, २६ जानेवारीला काही कार्यक्रम वगैरे पाहिले. पण असा संगीत रजनीचा कार्यक्रम पाहिला नव्हता.
गटनेते यांच्या बैठकीमध्ये कालच्या कार्यक्रमाचा विषय निघाला त्यावर तुम्ही तुमचं काही मत मांडलं नाही असे विचारले. तेव्हा मला इथे संगीत रजनीचा कार्यक्रम ठेवलेला आहे असे डायरेक्ट पत्रच वाचायला मिळाले. आता नवीन अध्यक्षांना वाटले असेल नवीन प्रकार करायचे असतील म्हणून त्यांना काही विरोध केला नाही, असे सांगितल्याचे उपसभापतींनी सांगितले.
पण, मूळ मुद्दा असा आहे की असे प्रकार घडले कि ज्यामध्ये उपसभापती म्हणून मत विचारले जात नाही. अध्यक्ष यांचे अधिकार नाकारत नाही. विधानपरिषदेचे उप सभापती या नात्याने सभागृहाचे काम आणि अन्य कुठलेही काम करण्याच्या संदर्भात माझी तयारी आहे. मला त्याच्यात कुठला मानपानाचा प्रश्न नाही. पण, एक स्वाभाविक भूमिका आहे की काय घडत हे निदान कळलं पाहिजे आणि हे काय फार चुकीचे आहे असे मला वाटत नाही.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचा विषय झाला. तेव्हा तो काय कार्यक्रम आहे ? कसा कार्यक्रम आहे ? याबद्दल मला काही माहित नाही असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोरच व्यासपीठावर बोलले.
चित्र कोणाचे यावरून वादविवाद झाला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येकाला आदर आहे. आम्ही तर २५ वर्ष त्यांच्यासोबत काम केले. त्यामुळे त्यांचे तैल चित्र कुठले लागणार हे बघावसं वाटले. तरी मी ते सर्व लोकांबरोबर जेव्हा पडदा उघडला तेव्हा कुठले तैलचित्र आहे ते पाहिले.
अधिकाऱ्यांवर माझी नाराजी नाही पण प्रत्येक अधिकाऱ्यांने मला सांगितले की चित्र कुठले लागणार ते फक्त अध्यक्षांना माहिती आहे. म्हणजे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे याना त्यांच्या कस्टडीत ठेवण्याइतके आपले अध्यक्ष पावरफुल आहेत ते मला त्यादिवशी कळलं. पण तरी बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा आणि बाळासाहेब यांच्याबद्दलची निष्ठा म्हणून एकही शब्द बोलले नाही अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली.