सांगली – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली (Chandoli) बुद्रुक येथील जानाईवाडी (Janaiwadi) नजीक असलेल्या डोंगरास आग लागली. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग भयाण असल्यामुळे तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangali District) शिराळा तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येतो.
काही विग्नसंतोषी लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत
काही विग्नसंतोषी लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत. या डोंगररांगामध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारची झाडं आहेत. तसेच करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे देखील आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगामध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक झाले आहेत. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.
आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाही
आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाही. अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वन्यजीव कार्यालयातील अधिकाऱ्यांची मुजोरी व या परिसरातल्या विविध समस्या यामुळे स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये मतभेद आहेत. भयाण आग लागलेली असताना देखील विझविण्यासाठी कोणीही ग्रामस्थ पुढे येत नसल्याचे चित्र होते.