चंद्रपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे (heavy rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका चंद्रपूर (Chandrapur) शहराला देखील बसला आहे. मात्र दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिकेला (Chandrapur Municipal Corporation) मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे. पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलविलेल्या नागरिकांची आबळ होत आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसराला झरपट नदीच्या पुराचा फटका बसला. नदीच्या पुराने प्रभावित नागरिकांना महापालिकेच्या प्राथमिक शाळेत हलवण्यात आले आहे. मात्र या शाळेतील सुमारे 115 नागरिकांना अन्न व इतर सुविधा वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दोन दिवस पूरग्रस्तांना खाण्यासाठी केवळ भात दिल्याने मनपाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. पूरग्रस्त आधीच संकटात सापडले आहे, असे असताना त्यांना जेवण देखील नीट मिळत नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
हद्द म्हणजे आज सकाळचा चहा देखील या पूरग्रस्त नागरिकांना मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूरग्रस्त स्वतःच्या पैशाने साहित्य आणून जेवण तयार करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे महापुरात आपले सर्व साहित्य गमावलेल्या पूरग्रस्तांची महापालिकेकडून थट्टा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या नागरिकांना दोन दिवस केवळ भात खाऊन काढावे लागले, तर आज त्यांना सकाळचा चहा देखील मिळाला नसल्याचे समोर आले आहे. या पूरग्रस्तांना महापालिकेने योग्य त्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी चंद्रपूरकरांच्या वतीने करण्यात येत आहे.
दुसरीकडे राज्यात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. गडचिरोली, पालघर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. गेल्या 24 तासांत पवसामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत झालेल्या मृतांचा एकूण आकडा 97 वर पोहोचला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा सपर्क तुटला असून, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.