चंद्रपूर : जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्राात (Restricted area) जाऊन काही हौशी छायाचित्रकार (Photographer) वाघाचे (Tiger) फोटो काढतात. असे फोटो काढताना त्यांच्याकडून अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात. वाघापासून अगदी दहा फुटांच्या अंतरावर जाऊन ते फोटो काढतात. याची गंभीर दखल आता वनविभागाच्या वतीने घेण्यात आली आहे. जे छायाचित्रकार फोटो काढताना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वाघाचे फोटो काढताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत. जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांचे छायाचित्र तसेच व्हिडीओ शुट करण्यासाठी अनेकांकडून जीव धोक्यात घातला जात आहे. 1 जून 2021 रोजी ताडोबाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाघाचा रस्ता अडवून अशाच रीतीने चित्रीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित छायाचित्रकारांवर कारवाई करण्यात आली होती.
जिल्ह्यातील अनेक भागात वाघाचा मुक्तसंचार असतो मात्र स्थानिक नागरिकांना वाघाचे वर्तन माहित असल्याने स्थानिक सहसा या वाघांच्या वाट्याला जात नाहीत. मात्र जिल्ह्याच्या बाहेरून येणारे हौशी पर्यटक आणि छायाचित्रकार या वाघांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करतात. वाघाच्या अगदी जवळ जाऊन छायाचित्र काढले जाते. यामुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यामधील संघर्ष अधिक तिव्र झाल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान जे छायाचित्रकार अशा पद्धतीने वाघाचे छायाचित्र काढतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच अशापद्धतीने छायाचित्र काढू नका असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा पद्धतीने छायाचित्र काढल्यास मनुष्य आणि वनजीव यांच्यातील संर्घष तीव्र होत आहे. यातून अनेकवेळा मनुष्यावर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडत आहेत.