नागपूर : मुंबईमध्ये भाजपचा महापौर होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतिने मुंबईत भाजपची सत्ता येईल असा दावा करत असतांना उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी टीका केली आहे. राज्यात सत्तांतराच्या धामधुमीतच भाजपने खांदेपालट केली होती, त्यामध्ये मुंबई शहराची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर तर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत रान पेटवले आहेत. त्यातच आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच दरम्यान ठाकरे यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा महापौर असा दावा बावनकुळे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची अनेक वर्षांपासून सत्ता आहेत. त्यात शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत.
त्याच दरम्यान आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महानगर पालिकेत आता सत्ता आणायची असून त्यासाठी पक्षप्रवेशाचे स्फोट होणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे कुटुंबापुरता पक्ष आहे, त्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक निवडणुकीच्या पूर्वी प्रवेश करतील.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली असल्याचा आरोप करत ठाकरे यांचा पक्ष मुंबईत सत्तेत येणार नाही असा दावाही केला आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष शेलार सत्ता आणतील असं देखील बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
याच दरम्यान शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटा ऐवजी भाजपचा महापौर होणार का ? अशी चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.