मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलन पेटले असताना ओबीसीचा एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रचंड टिका केली. त्यामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यातच दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करीत वातावरण पेटविले आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना भाजपाकडून ऑफर मिळाल्याचा आरोप केला आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की भुजबळ यांना भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही ऑफर दिलेली नसल्याचा खुलासा केला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस किंवा भाजप पक्षाकडून भुजबळांना कुठल्याही प्रकारची पक्षप्रवाशाची ऑफर देण्यात आलेली नाही. पक्षाचा प्रमुख म्हणून ईश्वर साक्ष सांगतो की ते सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची काय गरज हा एक मोठा प्रश्न आहे. भाजपा पक्षाकडून भुजबळांशी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा भुजबळांकडूनही असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.
आरक्षणाच्या संदर्भात जाती जातींमध्ये तेढ निर्माण होणे योग्य नसून मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण घेतल्यास त्यांना 16 ते 17 टक्के आरक्षणाचा फायदा मिळेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्यास मिळणारा फायदा किती असेल ? 351 जातींमध्ये आरक्षणाची टक्केवारी किती येईल हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे . यासाठी मराठा समाजाच्या सर्वपक्षीय चाळीस-पन्नास नेत्यांनी एकत्र बसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी आणि मराठ्यांना जास्त जास्त आरक्षण कसे मिळवून घेता येईल याचा विचार करावा असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी 31 डिसेंबरला सरकार कोसळणार असून नवीन सरकार ही महाविकास आघाडीचे येणार असल्याच्या दावा केला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले की, 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. आणि येणाऱ्या काळात शिंदे फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार असून तेव्हाही महायुतीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.