गजानन उमाटे, नागपूर : जळगावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर केलेल्या टीकेनंतर आता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यावर भाजप नेते संतापले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. तर मोदी या वादळापुढे उद्धव ठाकरेंनी कितीही मशाली लावल्या तरीही त्या विझतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मोदीजी यांना देशानं पसंती दिलीय. मोदीजी यांचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील मोदीजी यांची उद्धव ठाकरे यांना भिती वाटतेय. ज्यांच्या भरवशावर 2014, 2019 मध्ये तुमचे खासदार निवडून आले. आता मोदींवर टीका करणे ही बेईमानी आहे. कितीही मशाली लावा 2024 ला मोदीजींच्या वादळाने त्या विझणार.. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलताना तारतम्य सांभाळावे. मोदीजींचा वारंवार ऐकेरी उल्लेख करणे, याचा स्फ़ोट होऊ शकतो.
शिवसेना कुणाची हे पाकिस्तानातील जनताही सांगू शकले, असं वक्तव्य उद्धव ठाकरे जळगावातील सभेत वक्तव्य केलं. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय, भारतीय लोकांवर विश्वास नाही.. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलंय, रोज लोकं सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहित आहे शिवसेना कुणाची, हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
पाच वर्षे मातोश्रीवरुन जे जे सांगितलं ते के केलं. देवेंद्रजी यांनी भावाप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम केलं. मात्र तुम्ही बेईमानी केली. जुनी भाषणं उद्धव जी विसरले. त्यांनी जुने भाषणं काढून बघावे, अशी आठवण चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली.
दरम्यान, महाविकास आघाडी भविष्यात एकत्र असेल का हे आताच सांगू शकत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. यावरून चंद्रेशखर बावनकुळे म्हणाले, ‘शरद पवार काय बोलले हा त्यांचा प्रश्न… महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे कधी एकत्र सभा घेतात.कधी ऐकटे सभा घेतात. त्यामुळे पवार साहेबांना आपोआपच कळेल. ज्यांचे 50 लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्त्व करु शकेल का.. असा टोला बावनकुळे यांनी लगावला.