Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती येत्या रविवारी १९ फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरा-शहरात शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पहायला मिळणार आहे. या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर (Agra Red Fort) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दिवान ए आम सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे. या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र सामाजिक संस्थांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम धडाक्यात साजरा होणार आहे.
मुघल आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचं विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि दगेखोर बादशहानं शिवरायांना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यावर रचला.
औरंगजेबानं १९६६ मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं होतं. दगेखोर औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारावं की नाही, या द्विधेत महाराज होते. अखेर पुत्र संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे दोघं १२ मे १९६६ रोजी आग्रा येथे पोहोचले. मात्र कपटी औरंगजेबानं या दोघांना इथेच बंदी बनवून ठेवलं. अवघा महाराष्ट्र संकटात सापडला होता.
तीन महिने बंदीत राहिल्यानंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि काही निष्ठावान सैनिकांसोबत आग्रा येथून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निघाले. हा दिवस होता १७ ऑगस्ट १९६६.
आग्रा येथील हा किल्ला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध ताजमहल या किल्ल्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे काही इतिहासकार, या किल्ल्याचं वर्णन करताना चार भिंतींनी घेलली प्रासाद महाल नगरी असं करतात. मुघल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब येथेच राहत होते. इथूनच ते संपूर्ण भारतावर शासन करत होते.
आग्रा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरून ताजमहालचं विहंगम दृश्य पाहता येतं. तु सुमारे ३ किमी परिसरात हा किल्ला विस्तारलेला आहे. तर किल्ल्याच्या भोवती ७० फूट उंच भिंती आहेत. राजस्थानातून आणलेल्या वाळूच्या दगडापासून किल्ल्याच्या भिंती उभारल्या आहेत. किल्ल्याला मुख्य चार दरवाजे आहेत. त्यापैकी एक खिजारी गेट म्हणून ओळखला जातो.तो नदीत उघडत असे. या घाटांमध्ये बादशाहला स्नान करायला आवडायचं, असं सांगण्यात येतं.