गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 25 नोव्हेंबर 2023 : हिंगोलीत उद्या 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही? अशी शंका वर्तवली जात होती. पण वडेट्टीवार यांनी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी त्यांना छगन भुजबळ यांनी तीन ते चार वेळा फोन केल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्या छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. हिॅगोली येथील मेळाव्याला मी जाणार आहे. दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी विनंती केली. त्यामुळे मी हिॅगोली येथील मेळाव्याला जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिॅगोलीचा मेळावा सर्वपक्षीय आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी गरज पडल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मी सुद्धा ओबीसींवर अन्याय होईल तिथे लढण्यास तयार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ यांचा 3-4 वेळा मला फोन आला. ओबीसींच्या हक्कासाठी आपण लढत आहोत. त्यात आपल्यात मतभेद आहेत असं दिसू नये, असं भुजबळ यांनी मला सूचवलं. मलाही त्यांची भूमिका पटली आहे. ओबीसींच्या भावनेला छेद जाऊ नये. चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून ओबीसींच्या हितासाठी सभेला जाणार आहे. आमच्या 300-400 जातींच्या हितासाठी जाणार आहे. आमच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजात वेगळा संदेश जाऊ नये म्हणून एकाच मंचावर आम्ही सर्व येणार आहोत, असं सांगतानाच आमच्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी कायम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय. ते कसं आश्वासन पूर्ण करणार ते पाहू. आम्हाला कुणाचे नुकसान करायचे नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात काहीच आलबेल नसल्याचं सांगितलं. राज्यातील 20 मंत्री एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. हे मी लवकरच स्पष्ट करणार आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांची दिशा वेग वेगळी आहे. दिल्लीने समजावून सांगितलं तरी हे तिघे एकमेकांच्या समोर येत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.