‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले

| Updated on: Mar 22, 2025 | 4:04 PM

आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्येकवेळी जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली. दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

बंद दाराआड चर्चा  

अजित पवार यांना भेटण्यासाठी जेव्हा जयंत पाटील हे त्यांच्या कक्षात आले, तेव्हा तिथे गर्दी होती. जयंत पाटील कक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तिंना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे, या भेटीवर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमची भेट रोजच होते, विधानसभेतही होते. मग आम्ही काही मारामाऱ्या करायच्या का? प्रत्येक जण विधानसभेत एकमेकांना भेटतो, हाल हवाल विचारतो. राजकारणात आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकांचे शत्रू नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकीची देखील घटना घडली, या घटनेत पोलीस देखील जखमी झाले. यावर देखील यावेळी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. जो चुकला असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. सक्तीची कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांनी हे विधानसभेत देखील सांगितलं आहे. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच कोरटकर वर्षावर असतील तर संजय राऊत यांनी तेथे जाऊन कोरटकरांना घेऊन यावे, असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी लगावला आहे.