नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच, ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्यावर संपूर्ण राज्यात भाजपसह शिंदे गटाने विरोध केल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा कागदपत्रे सादर करत आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. त्यावर छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे आता थांबायला हवं. अजित पवार यांनी संभाजी राजे यांचा अपमान केला नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचे काम केले आहे. अजित पवारांनी तसं केलं नाही. संभाजीराजे यांनी स्वराज्याचे रक्षण केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं आहे. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. भाजपच्या नेत्यांची वक्तव्व्यावर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. जर अजित पवार यांचं चुकीचं असतं, तर विधान सभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे. असं छगन भुजबळ यांनी म्हणत शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यालाही सहमती दर्शविली आहे. याशिवाय शिवाजी महाराज यांना असलेल्या बिरुदावरही भुजबळ यांनी भाषी करून काही सवाल उपस्थित केले आहे.
त्यावेळी एका वर्गाने शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का ? ते फक्त त्यांचेच प्रतिपालक आहे का ?
आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा. शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे. एक-एक दोन-दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का ?
चौथी पासून सातवी पर्यंत एक एक धडा अभ्यासक्रमात टाकायला हवा, पण काही वेळा इतिहास गाळला जातो, या विषयावर इतिहासकार, लेखक यांनी नेमकं मार्गदर्शन करावं.
ही सर्वच आपली दैवतं आहे. कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्यरक्षक म्हणा असं भुजबळांनी म्हंटलं आहे. याशिवाय शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात मला ही पदवी मान्य आहे असंही भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
मी शरद पवार यांच्यासोबत फिरलो आहे, सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आहे, महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं
जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे ? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा असेही भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
अयोध्याला गेले तरी कामाचा झपाटा कमी होऊ देऊन नका, तिकडून आल्यानंतर काशी आहे, रामेश्वर आहे सगळीकडे जा. अष्टविनायक आहे, सगळीकडे जा आणि आशीर्वाद घेऊन या असं म्हणत भुजबळांनी चिमटा काढला आहे.