नाशिकः नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले, ते फक्त सुहास कांदे आमदार असल्यामुळे. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली.
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राऊत रविवारी नांदगाव मतदार संघात होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांनी राऊत यांच्यासमोर आपले दुःख मांडले. आमदार कांदे म्हणाले, राऊत साहेब आपणच वाली आहात. आम्ही आमचं दुःखं कोणाकडे मांडायचं (असं म्हणत छगन भुजबळ यांना टोला हाणला). मी भुजबळ यांच्या मुलाला पाडलं म्हणून बोलत नाही. ते मला सावत्र मुलासारखं करतात. आम्ही कोणाकडे जाणार. तुमच्याकडेच मागणार आणि आता निधी दिला नाही तर अख्खी DPDC घेऊन येणार असा इशाराही दिला.
नांदगावला लाल दिवा मिळेल
संजय राऊत म्हणाले, सुहास कांदे यांनी अत्यंत तळमळीने विषय मांडले. एखाद्या आमदाराला आपल्या मतदार संघाबद्दल किती आत्मियता असावी. सुहास कांदे पाहुणचार चांगला करतात. एकदा भुजबळ यांना पाहुणचारला बोलवा, करून तर पाहू. आता भगवा खाली येणार नाही. आपण भुजबळ यांना सांगू नांदगावचा नाद सोडायला सांगू. आज नाशिकला लाल दिवा आहे. उद्या नांदगावला मिळेल. महाविकास आघाडी सरकार झालं नसतं, तर ते मंत्री झाले असते का, आमच्यावरती आणि नांदगाववरती अन्याय करायला असा टोलाही त्यांनी हाणला.
कांदे आमदारकीला न्याय देतात
राऊत म्हणाले, सुहास कांदे शिवसेनेच्या आमदारकीला न्याय देतात. लोक म्हणतात आम्ही अभ्यास करत नाही. मात्र, तुमच्यावर अन्याय झालाय हे जो पटवून देतो, तोच उत्तम लोकप्रतिनिधी मानला जातो. इकडे पाणी मिळत नाही. इतके दिवस झाले, पण हे सरकार तुम्हाला पाणी देईल. इथला पाणी प्रश्न सोडवणं हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आपण सर्व ठिकाणी जाऊ केंद्रात जाऊ, पण तुमच्या कारकिर्दीत प्रश्न हा पाणी सुटला पाहिजे, म्हणत राऊतांनी कांदेंना बळ दिले.
नांदगावची जागा मिळणार नाही
संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून भुजबळांवर शरसंधाण साधले. ते म्हणाले, या मतदार संघासाठी भुजबळांची हवा होती. पण मी म्हटलं नांदगावची जागा मिळणार नाही. या भागाला आमदार आहे की नाही तेच कळत नाही. मात्र, आता नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला, तो फक्त सुहास कांदे आमदार असल्यामुळे. या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मायबाप सरकारने मदत केली पाहिजे. मग आम्ही कोणाकडे हातपाय पसरायचे. कोणी त्याच्या घरच्यासाठी मागत नाही. सरकारकडे मागण्याचा अधिकार आमदार, जनतेला आहे. प्रसंगी खेचून आणण्याचा अधिकार आहे. वीजबिल माफ करा आम्ही सांगत नाही, सवलत द्या असं सांगतोय, असंही राऊत म्हणाले.
मोदी कृपेने माचीस दोन रुपयांना
राऊत म्हणाले, एका जाणिवेने हे सरकार आपण केलं. सुहास अण्णा गाडीत भारतीय जनता पक्षाचे लोक किती फिरले, तरी त्यांचे पेट्रोल संपले आहे. माचीस दोन रुपयांना झाली आहे. मोदी कृपा म्हणायची. सरकार पाडण्यासाठी भाजप देव पाण्यात घालून बसले आहे, पण सरकार पडणार नाही. देव म्हणतात आम्हाला पाण्यातून काढा. अन्याय सहन करू नका हे शिवसेनेचे ब्रीद आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. निकाल लागण्यापूर्वी शब्द फिरवले. हे सरकार अन्यायाच्या चिडीतून निर्माण झाले आहे. हे सरकार चालत आहे आणि चालणार. पाटील म्हणतात, आम्हाला चांगली झोप लागते. मात्र, आम्हाला भाजप सरकार घालवले तेंव्हापासून चांगली झोप लागते. आता जास्त आमदार आता निवडून आणावे लागतील, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्याः
कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत आता 66 टक्के सूट; जळगाव परिमंडळात 82 हजार जणांना लाभ
धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करा, लसीकरण वाढवा; पालकमंत्री भुजबळांचे आदेश
कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत आता 66 टक्के सूट; जळगाव परिमंडळात 82 हजार जणांना लाभhttps://t.co/ioF06cvZ1B
|#KrishiPumpelectricitybill|#MSEDCL|#billdiscount|#farmers|#Jalgaon|#Nashik|#MahaKrishiUrjaAbhiyan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021