मुंबई | 10 डिसेंबर 2023 : सध्या जी गरळ ओकली जातेय त्या साऱ्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. संजय राऊत आणि रोहित पवार यांनी देखील छगन भुजबळांमागे फडणवीसचं असल्याचं म्हटलंय. तर, दुसरीकडे जरांगे यांनी यापुढे फडणवीसांवर टीका करू नये असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी जरांगेंना दिलाय. आरक्षणाच्या मुद्दयावर छगन भुजबळ हे ही सभा घेताहेत. पण, त्यांच्या एका विधानावरुन आता फडणवीस हे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मला वाटतं आठ दहा नेते आहेत त्यांचे. हेच फक्त मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतील. त्यांनी सांगितल्याशिवाय हे बोलूच शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब अधिवेशन सुरू आहे. तुम्ही यांना समज देऊन सांगा. यांनी किती जातीवाद केला तरी ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या सुखा दुःखात राहतील, असं म्हटलंय.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही. मग, आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय तुमची भाषणं कोण लिहून देतंय. तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढायला लागेल असा इशारा दिलाय.
जालन्याची घटना घडली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली होती. माझं काही सगळ्यांशी नीट बोलणं झालं नव्हतं. ती पहिली माहिती होती आणि त्यातून असं बाहेर येत होतं की पोलिसांवर काही तरी झाले म्हणून लाठीचार्ज झाला. नंतर ज्यावेळेस मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आलं की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी लाठी चार्ज केला नसता तर पोलिसांना जखमी व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे गृहमंत्री म्हणून त्या लाठीचार्जची माझा थेट संबंध नसताना देखील मी थेट माफी मागितली, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी इंदापूर येथील सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तराचा दाखला दिला. मी दोन महिने बोलतोय पण विधानसभेत होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. यात जमाव हिंसक झाला आणि एक दोन नाही 79 पोलीस अधिकारी जखमी झाले आहे. मग पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं वाजवी बळाचा वापर केल्यामुळे पन्नास आंदोलन करणारे आंदोलक जखमी झाले असे उत्तर दिल्याचे सांगितले.
खासदार संजय राऊत आणि रोहित पवार यांनी याचवरून फडणवीस यांना घेरलं. छगन भुजबळांच्या तोंडी फडणवीस यांचीच भाषा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जरांगे पाटील यांनीही या साऱ्यामागे फडणवीसच आहेत. त्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे विधान केलंय. फडणवीस आणि अजित पवार गटावरही त्यांनी टीका केलीय. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आमचा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अजित पवार गटाचे एक नेते भुजबळ सभांमधून मराठ्यांना ओबीसींचं आरक्षण नको असल्याची भूमिका घेतात. तिकडे बीडमध्ये अजित पवार गटाचेच दुसरे नेते प्रकाश सोळुंखे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला योग्य ठरवतात. त्यामुळे अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय? याबाबत संभ्रम आहे. कारण सत्ताधारी नेतेच सभागृह सुरु असताना तिथं भूमिका मांडण्याऐवजी सभांमधून भूमिका मांडू लागले आहेत.