मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटून सरसकट आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध असल्याचे सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करीत सरकारलाच आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतू ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे. अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करून मराठ्यांना जर आरक्षण वाटले तर ओबीसींचे आरक्षण नष्ट होऊन जाईल. जशी मराठ्यांची मते हवी आहेत तर ओबीसींची मतेही महत्वाची आहेत. ती नको आहेत का ? असाही सवाल करीत ओबीसी गुपचुप आहे, गरीब आहे म्हणून त्यांना काय समजत नाही असे समजू नका अशा शब्दात भुजबळ यांनी सरकारची कोंडी केली आहे.
मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतू ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यायला हवे. निजामशाहीत कुणबी वंशावळ काढून आधी कुणबी पाच हजार आहेत असे सांगितले गेले. आधी ओबीसीच्या 250 जाती होत्या. नंतर त्यात वाढ झाली आहे. परंतू सरकारने दोन दिवसांत ऑफीस थाटून कुणबी सर्टीफिकेट्स वाटायलाच सुरुवात केली आहे. इतरांना सर्टीफीकेट्स मिळायला वर्षभर लागते. यांना तर कुणबी सर्टीफीकेट राजरोस वाटले जात आहेत, त्यामुळे नोकरीत आरक्षण मिळणार आहे, राजकीय आरक्षण मिळणार आहे. इतरांना 1950 पूर्वीचे पुरावे मागितले जात आहेत. वंशावळीत एकाला सर्टीफीकेट मिळाले तर सर्व नातेवाइकांना आरक्षण लागू होणार आहे तर ओबीसी आरक्षण राहील का ? असाही सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
बिहारात जातगणना झाली तेथे 63 टक्के ओबीसी निघाले. येथे ही जातगणना होऊ द्या. लोकांना कळू दे किती आहेत ओबीसी. नेहमी ओबीसीच्या संख्येवरून प्रश्न करणाऱ्यांना कळू दे खरी संख्या किती ते असेही भुजबळ यावेळी म्हणाले. माळी आहेत म्हणून आमदाराची घरे जाळता. काय बोलले होते ते प्रकाश सोळंकी ? हे बरोबर नाही. सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहीजे. तुम्हाला ओबीसींची मते नको का ? ओबीसींमध्ये 375 जाती आहेत. सुतार, लोहार, वंजारी, धनगर अशा अनेक जाती 12 बुलतेदार आहेत. त्यांची मते सरकारला नको आहेत का? असाही सवाल भुजबळ यांनी केला आहे.