फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र यंदा मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज असून सोमवारपासूनच त्यांनी उघड शब्दात आपली नारीज बोलून दाखवली आहे. हो मी नाराज आहे, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी अस्वस्थता स्पष्ट शब्दांत मांडली. त्यातच आज समता परिषदेच्या मळाव्यात लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रमच उपस्थितांसमोर मांडला. फडणवीसांपासून ते राष्ट्रवादीतील सर्व नेते पटेल, तटकरे हे माझ्या मंत्रीपदासाठी आग्रही होते. फडणवीसांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं भुजबळांना घ्या, पण अखेर नाव मंत्रीमंडळात आलंच नाही, असे म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.
भुजबळांनी सांगितला A To Z घटनाक्रम
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय काय झालं तो सगळा घटनाक्रम भुजबळांनी उलगडून सांगितला. काय काय झालं सर्वांना माहीत आहे. काही वक्त्यांनी बोलूनही दाखवलं. मोदी आणि शहा यांनी प्रत्येक मतदारसंघ कुणाला जायचं याची चर्चा झाली. नाशिक भुजबळांना द्यायचं असं मोदी म्हणाले. शिंदे म्हणाले, आमचा सिटिंग उमेदवार आहे. मोदी म्हणाले, नाही, त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्या उमेदवाराला समजावतो. आम्हाला पटेल यांच्या घरी बोलावलं. त्यांनी मोदींचा निरोप दिला. मी म्हटलं मी काही तिकीट मागितलं नाही. ते म्हणाले, तुम्हीच उभं राहा. मी २४ तास विचार करायला घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं नाही राहणार. तर म्हणाले, तुम्हाला उभं राहावं लागेल. नसेल तर दिल्लीला जाऊन सांगा. मग मी म्हटलं ठिक आहे, असं भुजबळ म्हणाले.
आधीच जाहीर करायचं ना…
नाशिकला आलो. कार्यकर्ते म्हणाले, तुम्ही उभे राहा. एक आठवडा गेला. माझं नाव कोणी नाही घेईना. दुसरा गेला, तिसरा आठवडा झाला. दोन चार नावंच जाहीर व्हायचे राहिले. मी किती थांबायचं. त्यांनी सांगितलं म्हणून वाट पाहिली. त्यानंतर मी स्वत:हून जाहीर केलं की मी नाही लढणार. त्यावेळी कोणी काही बोलले नाही. १० दिवसांनी सांगितलं भुजबळांनी घाई केली. मी घाई केली ठिक आहे. पण तुम्ही घाई करायची ना. माझं नाव आधीच जाहीर करायचं ना , असंही भुजबळांनी सांगितलं.
घर की मूर्गी दाल बराबर का ?
राज्यसभा आली. मला सांगितलं सुनेत्रा ताई पडल्या. आपल्याला त्यांचा विचार करावा लागला. मी म्हटलं ठिक आहे. दुसरी राज्यसभा आली. सातारची जागा आपल्याला मिळाली. पण भाजपला उदयनराजेंसाठी हवी होती. साताऱ्यासाठी नितीन पाटील इच्छुक होते. अजितदादांनी मान्य केलं. नितीन पाटीलला सांगितलं तुम्ही माघार घ्या. मी तुम्हाला खासदार करेन. परत नितीन पाटील यांचं नाव आलं. खासदारकीची पोस्ट देताना चर्चा केली होती. मलाही शब्द दिला होता ना. जो न्याय त्याला दिला मला का नाही दिला. घर की मूर्गी दाल बराबर का ? असा सवाल भुजबळांनी विचारला. मला म्हणाले, तुमची गरज राज्यात आहे. त्यामुळे तुम्हाला लढावं लागेल. कारण लोकसभेत उलटे सुलटे निकाल आले होते. मला विधानसभेचं तिकीट दिलं. मी लढलो,असं भुजबळांनी सांगितलं.
मी माझ्या लोकांना सोडू शकत नाही
रात्री १० वाजता अंतरवली सराटीचे पुढारी आले. सलाईन लावून. १० वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या. त्यांच्या २ वाजेपर्यंत सुरू होत्या. त्याचा परिणाम झाला. आमचे लोक हिंमतीने लढले. मकरंद पाटलांना मंत्री करायचं होतं. आता सांगतात. नितीन पाटीलला राजीनामा द्यायला सांगतो. तो खाली येईल. त्या जागेवर तुम्ही जा. मला म्हणतात तुम्हाला जायचं होतं ना? म्हटलं आता. मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभं करायचंच नव्हतं. मला निवडणुकीला उभं केलं. ज्यांनी जिवाचं रान करून माझ्यासाठी लढले ते डोकी फोडून घेतील ना. त्यांना काय सांगायचं. राज्यसभेवर जाताना मला इथे राजीनामा द्यावा लागेल. मतदारांना काय सांगायचं. मी म्हटलं हे काही होणार नाही. माझ्या लोकांना मी आज सोडू शकत नाही. प्रफुल्ल भाईंनी मध्यस्थी केली. मी अजितदादांशी बोललो. त्यांना समजावून सांगितलं. ते म्हणाले, बसून चर्चा करू. ते कधी बसले नाही. चर्चा केली नाही असा आरोप भुजबळांनी केला.
प्रफुल्ल पटेल यांनीही प्रयत्नाची पराकष्ठा केली. तुम्ही असं करू नका सांगितलं. सुनील तटकरेंनी प्रयत्न केले. भुजबळांना घ्या सांगितलं. फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं भुजबळांना घ्या. असं करू नका सांगितलं. ठिक आहे. आता जे झालं ते झालं. कोणी केलं काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, असं म्हणत मंत्री मंडळातून नाव वगळल्याबद्दल भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.