महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे, दरम्यान छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज होते. त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आज पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे, यावर आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी जो काही निर्णय घेतला असेल तो मी तुम्हाला सांगेल का? मी रोज नाराजी नाराजी करून तुमच्यासमोर ओरडत बसू का? मला काय घाई नाही, मी निर्णय घेतला आहे, माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे, त्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत भुजबळांना विचारलं असता त्यांनी यावर फार बोलणं टाळलं. मला काही कल्पना नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहातील काय करायचे ते. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ते ऐकल्यानंतर देखील अंगावर काटा येतो, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर आले. यावर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं आहे. पवार साहेब देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.