मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा मी अजितदादांच्या पायावर डोक ठेवून म्हणालो दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी पहाटेच्या शपथविधीपूर्वी नेमकं काय- काय घडलं त्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं तेव्हा मी तीथे नव्हतो. परंतु आपल्या माध्यमातून सांगतो, ते षडयंत्र होतं तर ते कोणी रचलं होतं? एक तर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. मग कोणी रचल, काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं की भाजपच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं. की त्यावेळेला आमच्या बैठका सुरू होत्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठका सुरू होत्या. यातीलच एका बैठकीमध्ये शरद पवार साहेब आणि खर्गेंचा थोडासा वाद झाला, त्यानंतर पवार साहेब बैठकीमधून रागानं निघून गेले. मात्र त्यानंतरही आमच्या बैठका सुरूच राहिल्या. रात्री आठ वाजता मिटिंग बोलावली गेली, त्या मिटिंगला अजितदादा काही हजर नव्हते. म्हटलं कुठेतरी कामात अडकले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा टीव्ही लावला तेव्हा कळालं की अजितदादांचा शपथविधी झाला. त्यानंतर मी पवार साहेबांकडे गेलो. तोपर्यंत पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, आणि सांगितलं होतं की आपण आता मजबुतीनं उभं राहिला हवं, काहीही घडता कामा नये. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.