मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वीच शुक्रवारी स्पष्ट केलं होत की हा काही माझा राजकीय दौरा नाही. सहकाऱ्याची आजी वारली, त्यामुळे सांत्वनासाठी जाणार आहे. दरम्यान येवल्यात गेल्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचं नाव न घेता त्यांना डिवचलं. हा काही माझा राजकीय दौरा नाही, मराठा बांधवांना ज्याला पाडायचं असेल त्याला पाडतील. मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा, आता काही जण पडणार असतील तर त्याला मी काय करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया सोमर आली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
मनोज जरांगे माझ्या मतदारसंघातील कोणाच्या तरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले. कोणाच्या तरी येथे सांत्वनासाठी आले. दु:खाच्या प्रसंगात कार्यकर्त्याच्या घरी जाणं चांगली गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं की आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, तेही त्यांचं बरोबर आहे. मात्र शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस, फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि मी आम्ही कोणीच आरक्षणाला विरोध केलेला नाही, मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आम्ही आता आरक्षणाच्या लढाईसाठी सामूहिक उपोषणाची तयारी करणार आहोत, असं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोणाचं आलं तरी उपोषण करणार आहे. सरकार महायुतीचे स्थापन होणार यात शंका नाही. जे अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. शांततेने कोणीही लोकशाही मार्गाने आपलं म्हणण मांडू शकतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.