दत्ता कानवटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 05 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं. प्रभू राम हे मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा निषेध केला. तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिरसाट यांनी सवाल केला आहे. शरद पवार यांना दंगली घडवायच्या आहेत का? असा थेट सवाल त्यांनी केला. तसंच या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.
इतरांच्या भावना दुखावून राजकारण साधण्याचे काही जण काम करत आहेत.प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. हे वक्तव्य का करायला लावलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर हे वक्तव्य वादंग निर्माण करून वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे. शरद पवार यावर काही बोलले नाहीत. विरोधक बोलत नाहीत. याचा अर्थ राज्यात जातीय दंगल घडवण्याच्या आहे का?, असा थेट सवाल संजय शिरसाट यांनी शरद पवार यांना विचारला आहे.
काहीच दिवसात राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामुळे सावध राहा. जितेंद्र आव्हाड तुम्हाला या वक्तव्यावर दाखले देण्याची का वेळ आली? राम मंदिरच्या उद्घाटनावेळी हा विषय का काढता? पण या निश्चित कारवाई होईल.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी या विषयावर चर्चा करणार आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली गेली. त्यांना धमकीही देण्यात आली. यावर बोलताना महंतांनी दिलेली धमकी म्हणजे त्यांनी त्यांची चिड व्यक्त केली आहे, असं शिरसाट म्हणाले.
प्रभू रामाच्या दर्शनासाठी रेल्वे सुरू करणं म्हणजे भारतातील प्रत्येकाने या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. हा उद्देश आहे. त्याला पक्षाचं नाव लावू नका. राजकारण करू नका. राम दर्शनाला घेऊन गेल्यावर तुम्हाला राजकारणच आठवतं. धार्मिकतेचे फळ मिळत असेल तर काय वाईट आहे?, असं शिरसाटांनी म्हटलं.