दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 19 डिसेंबर 2023 : अंतरवली सराटीतील आरोपी ऋषीकेश बेद्रे याला नुकतंच जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याने tv9 वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी समाजासाठी 25 दिवस जेलमध्ये राहिलो. समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये राहिलो तरी वाईट वाटणार नाही. मी समाजासाठी गोळ्या खायला तयार आहे. अंतरवलीत लाठीचार्ज झाला. तेव्हा रक्ताने भिजलेल्या आया बहिणींना मी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला गेलो होतो. मला दगडफेक झालेली माहीत नाही, असं ऋषीकेश बेद्रे याने म्हटलं आहे.
धुळे सोलापूर हायवेवर जाळपोळ झाली. तेव्हा पोलिसांसोबत उभा होतो. जळपोळीत माझा सहभाग नव्हता. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. पण मी आंदोलनात राजकारण बाहेर ठेऊन सहभागी झालो होतो. त्यामुळे शरद पवारांचा या आंदोलनाशी संबंध नाही, असं ऋषीकेश बेद्रे याने म्हटलं आहे.
मी यापूर्वी राजमाता जिजाऊची बदनामी केल्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं होतं. त्या प्रकारणात मी निर्दोष सुटलो आहे. मराठा आरक्षणासाठी मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेत काळे झेंडे दाखवले होते. हा असा माझा इतिहास आहे, असं ऋषीकेश बेद्रे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी माझं नाव घेतलं नाही. तर काही वाटलं नाही. माझं नाव घ्यावं असं काही नाही. पण मी यापुढेही कायम मराठा समाजासाठी प्रयत्न करत राहणार आहे, असं ऋषीकेश बेद्रेने म्हटलं आहे.
ऋषीकेश बेद्रेला अवैध हत्यार प्रकरणातही जमीन मंजूर झाला आहे. आंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून काल ऋषीकेश बेद्रेला जमीन मंजूर झाला. ऋषीकेश बेद्रेला पोलिसांवर हल्ला केलेल्या प्रकरणात गुरुवारीच मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला होता. 25 हजारच्या जात मुचलक्यावर ऋषिकेश बेद्रेला आंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यात मात्र ऋषिकेश बेद्रेला जाण्यास मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अगोदर मज्जाव करण्यात आलेला आहे.