दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 04 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशातच आता सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. मंगेश चिवटे आणि अतुल सावे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांना यावेळी देण्यात आला. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. मनोज जरांगे यांना उपचारांसाठी मुंबईला हलवण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर अतुल सावे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गरज पडली तर त्यांना उपचारासाठी आम्ही मुंबईला एअर ऍम्ब्युलन्स घेऊन जाऊ. डॉक्टरांशी चर्चा करून आम्ही त्यांना घेऊन जाणार आहोत. जर त्यांना ठीक वाटत असेल तर घेऊन जाणार नाही. आम्ही काल आमच्या नेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिफींग केलं आहे. कशा पद्धतीने हे आरक्षण देता येईल यावर चर्चा झाली आहे. यात तारखेचा घोळ काही नाही, असं अतुल सावे म्हणाले.
उपोषणानंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णलयात उपचार केले जात आहेत. पण पुढील उपचारांसाठी मनोज जरांगे यांना मुंबईला रुग्णालयात हलवलं पाहिजे, असं मत त्यांच्यावर उपचार करणारे डॉ विनोद चावरे यांनी व्यक्त केलं आहे. सरकारकडूनही मनोज जरांगे यांना मुंबईला हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीला त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. आपली तब्येत ठीक असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. समाज बांधवांनो, माझी काळजी करू नका. मी ठीक आहे, मुंबई जाण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. तर मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती वाढली हे यश आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समिती कुणबी दाखले शोधले पाहिजेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
शिंदे सरकारला आपण 24 डिसेंबरचा वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. तर 2 जानेवारीपर्यंत आम्हाला वेळ देण्यात आला आहे, असा सरकारचा दावा आहे. त्यावर मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती वाढली हे यश आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समिती कुणबी दाखले शोधले पाहिजेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
24 डिसेंबर हि समितीची वेळ आहे. दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर त्यांच्याकडे आहेत. आम्ही 24 तारीख हि सरकारला दिली आहे. तारखेचा घोळ करू नका, असं जरांगेंनी म्हटलं.