दत्ता कानवटे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 15 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अशात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. कुरेटिव्ह पिटीशनवर कधीही निर्णय येऊ शकतो आणि हा निर्णय सकारात्मक येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर या आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. ओबीसी आरक्षण पुन्हा कोर्टात चॅलेंज होऊ शकते. त्यामुळे जर एसईबीसी आरक्षणावर सकारात्मक निर्णय आला तर तो स्वीकारला पाहिजे, असं विनोद पाटील म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर भूमिका मांडत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. ते राज्यातील विविध ठिकाणी भेटी देत आपली भूमिका मांडत आहेत. त्यांच्या भूमिकेवर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज क्युरेटिव्ह पिटीशनबाबत निकाल लागेल. या निकालाबाबत चर्चा सुरु आहे. कारण 1 न्यायमूर्ती 25 तारखेला निवृत्त होताायेत. मात्र कायद्याने ते 25 पर्यंत कधीही निकाल देऊ शकतात. त्यामुळे आजच लागेल असं काही नाही, असंही विनोद पाटील म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील म्हणतात ओबीसीमधून आरक्षण आम्हाला हवंय. दुसरं आरक्षण नको. पण क्युरेटिव्ह पिटीशन हा वेगळा विषय आहे. सरकार म्हणतंय कुणालाही धक्का न लावता आरक्षण देऊ म्हणजे सरकार पुन्हा कायदा करेल असं दिसतंय. म्हणजे पुन्हा निराशा वाट्याला येण्याची शक्यता आहे. म्हणून क्युरेटिव्ह पिटीशन केली आहे. नकारात्मक सोडून द्या. पण सकारात्मक निर्णय आला. तर सरकारला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल, असं विनोद पाटील म्हणालेत.
सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर मग मार्ग मोकळा, नाही टिकले तर पोकळ कायदा आम्ही सरकारला करू देणार नाही. कुठलेही आरक्षण आव्हान देता येतं. मग ते ओबीसीचं का असेना… अनेकांनी आव्हान द्यायला अनेक लोक ठेवले आहेत .
आम्ही जर ओबीसी मध्ये गेलो तर आम्हाला का घेतले म्हणून एक लढाई सुरू होऊ शकते, असंही दिसतंय. ओबीसी आमचा अधिकार आहे. मात्र राजकीय लोक अशी भाषा का करतात की, कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. म्हणून आम्ही क्युरेटिव्ह पिटीशन केली आहे.