Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तर विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी यावरुन टीका केली आहे.
वैभव नाईक यांनी या घटनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळण्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावा अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली होती. पण श्रेय घ्यायला हा पुतळा राजकोटमध्ये उभारण्यात आला. त्यावेळी पुतळा कमजोर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते. इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत, छत्रपती संभाजी राजे यांचाही विरोध होता. मात्र विरोध डावलून पुतळ्याची उभारणी करण्यात आली”, असे वैभव नाईक म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाने उभारला म्हणून आता सांगत आहेत. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने याला पैसे दिले. लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी आले होते, तेव्हा जिल्हा नियोजनामधून पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे यावेळी झालेली सर्व कामे भ्रष्टाचाराच्या वादात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुतळा उभारणीत काहीच रोल नव्हता, तर मग सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे का मिरवत होतं? त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन का केलं? हात झटकणे बरोबर नाही. सार्वजनिक बांधकाम विभागच दोषी आहे”, अशीही टीका वैभव नाईक यांनी केली.
“कालचा उद्रेक हा शिवप्रेमींचा होता. मालवणमध्ये महाराष्ट्रातून शिवप्रेमी येऊन निषेध मोर्चा काढणार आहेत. हा पुतळा बांधकाम करतेवेळी पंचधातूचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यासाठी तकलादू लोखंड वापरले गेले. याची विटंबना केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी काही लोक काम करत आहेत त्याची पण चौकशी व्हायला हवी”, असा आरोपही वैभव नाईक यांनी केला.
“कालची तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. याच्या मुळाशी गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शिवप्रेमी म्हणून यापुढे ही आंदोलन करू. भाजपच्या अतुल काळसेकर यांनी जे वक्तव्य केलं, त्याच्या मुळाशी जायला हवं. खरंच हा कट आहे का? मुळाशी जायला हवं, नाहीतर जातीय तेढ निर्माण करतात म्हणून काळसेकर यांचेवर कारवाई व्हायला हवी”, असेही वैभव नाईकांनी म्हटले.