छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात नेमकं काय होतं? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड

| Updated on: Sep 10, 2024 | 5:30 PM

न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात नेमकं काय होतं? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
maharashtra chhatrapati shivaji maharaj statue collapsed in malvan
Follow us on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणातील प्रमुख आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चेतन पाटील याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच याप्रकरणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. आठ महिन्यापूर्वी नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. हा पुतळा 28 फुटांचा असून त्याचे ब्राँझ धातूने बांधकाम करण्यात आले होते. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.

आता पोलिसांनी जयदीप आपटेची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला होता, असा दावा सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात केला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे अवशेष जमा करण्यात आले होते. ते गंजलेले होते. पुतळा तयार करताना वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते का? याचा तपास करावा लागेल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. तर विरोधकही आक्रमक झाले होते. याप्रकरणी बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी लगेचच अटक केली. मात्र पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा सुमारे आठवडाभर फरार होता. अखेर तब्बल 11 दिवसांनी गेल्या आठवड्यात जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांची नजर चुकवत जयदीप हा त्याची पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

यानंतर त्याला सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.