मुंबई : सर्वांनाच वेध लागले आहे ते गणेशोत्सवाचे. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षा नंतर प्रथमच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव कुठल्याही निर्बंधांशिवाय साजरे होणार आहेत. तशा प्रकारचे निर्देशक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) दिले आहे. यानंतर गणेशोत्सवाचा(Ganpati Festival 2022) आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गणेशोत्सवात अखेरच्या पाच दिवसात दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे
गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर (ध्वनिवर्धक) वाजविण्यास परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे येथे पोलिस आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. त्यानंतर शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. दहीहंडी मंडळालाही परवानगी देण्यात आली आहे असेही शिंदे यांनी नमूद केले.
न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे ते म्हणाले. बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत अनेक सण हे निर्बंधांमध्ये राहून साजरे करावे लागले होते. काही सण तर मोकळेपणाने साजरे करताच आले नव्हते. यंदा मात्र दहीहंडी (Dahi Handi) आणि गणेशोत्सव (Ganeshtosav) दणक्यात साजरे होणार आहेत. सरकारने धुमधडाक्यात हे सण साजरे करण्यास परवानगी दिली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीला यावर्षी कोणतेही निर्बंध नसणार आहेत.
दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करा, अशी मागणी आमदारानं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली. शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली होती. प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी दिली जाणाराय. यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिली.