नाशिक : जिल्ह्यातील वंजारवाडी गावातील एक हृदयद्रावक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. ढगफुटीसदृश्य (Heavy Rain) पावसाने गवारी दाम्पत्याचा कोसळून जागीच मृत्यू (Death) झाला होता. त्यात तीन बहिणी आणि पाच वर्षांचा भाऊ वाचला होता. या घटनेनं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेत आई वडील दोघेही गेल्याने चारही भावंड अनाथ झाली होती. गवारी कुटुंबाच्या दुखद घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी याच बेघर आणि अनाथ झालेल्या कुटुंबाची भेट घेत त्यांना मदत केली आहे. गवारी यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.
याशिवाय या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती यावेळी चिवटे यांनी दिली आहे.
वंजारवाडी या गावात 9 सप्टेंबर 2022 ला पहाटे मुसळधार पाऊस झाला होता. याचवेळी गवारी कुटुंब राहत असलेले घर कोसळले होते.
त्यात गवारी पती-पत्नी यांचा मृत्यू झाला होता, या दुर्घटनेत मात्र त्यांची चारही मुलं वाचली होती. त्यामुळे या घटनेनं नाशिक जिल्हा हादरला होता.
या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती, त्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी केली जात होती.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनीही भेट दिली होती. त्यावेळी आर्थिक मदत अनेकांनी या गवारी कुटुंबातील मुलांना केली होती.
शासनांच्या योजनेतून त्यांना शिक्षण आणि घर मिळवून द्यावे अशी मागणी नातेवाइकांनी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक आमदार यांच्याकडे केली होती.