नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी वाढत असतांना प्रवेशाचं धक्कातंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राबविले जात आहे. मागील पंधरा दिवसांत जवळपास 70 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे असलेले भाऊसाहेब चौधरीच शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. यामध्ये आता ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि माजी आमदार असलेले घोलप पिता पुत्र यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू असतांना त्यांच्याच मुलीने शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच तनुजा घोलप यांनी मुंबईत भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री यांच्या भेटीचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तनुजा घोलप यांचा प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप या लवकरच शिंदे गटात अर्थातच बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तनुजा घोलप यांनी नुकतीच भेट घेतली असून प्रवेशासाठी मुख्यमंत्री यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.
बबन घोलप हे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्याकडे ठाकरे गटाचे उपनेते पद असून ते माजी मंत्री राहिले आहे.
समाज कल्याण मंत्री तसेच पाच वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला सुरुंग लावण्याचे कामच शिंदे यांनी केल्याचे बोलले जात आहे.
घोलप पिता पुत्र आणि एक कन्या माजी महापौर नयना घोलप या शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहे तर आता दुसरी कन्या तनुजा घोलप लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
संजय राऊत यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, कन्या माजी महापौर नयना घोलप उपस्थित होते.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सकारात्मक चर्चा झाल्याने तनुजा घोलप यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.