मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : राज्यातील एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी बसस्थानकांवर आता महिला बचतगटासाठी स्टॉलना मंजूरी दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकावर ‘आपला दवाखाना’ देखील सुरु होणार असून दहा टक्के स्टॉल माजी सैनिकांच्या विधवा पत्नींला दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नव्या वर्षांत प्रवाशांसाठी 3,495 एसटी बसेस सेवेत दाखल केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे प्रत्येक बसस्थानकांवर महिला सशक्तीकरण धोरणांतर्गत महिला बचत गटांना स्टॉलचे वाटप होणार आहे. राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी 10 ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याचा निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे. बसस्थानकांवरील स्टॉलच्या वाटपासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनीस यावेळी दिले आहेत.
सर्वसामान्यांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्यसरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ ही लोकोपयोगी योजना सुरू केली आहे. मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहे. परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान या योजनांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
एसटीच्या ताफ्यात 2200 ‘रेडी बिल्ट बसेस’ करीता निविदा काढण्यात आली आहे. या 2200 परिवर्तन साध्या बसेस मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच एसटीच्या 21 विविध विभागांसाठी 1295 साध्या बसेस भाडेतत्वावर घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. एसटी महामंडळ येत्या दोन वर्षांत 5150 ई-बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 303 वी संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी हे निर्णय जाहीर करण्यात आले. यावेळी मुखमंत्र्यांनी एसटी महामंडळाने एकाच दिवसांत ( 20 नोव्हेंबर ) 37.63 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविल्याबद्दल महामंडळाचे कौतूक करीत अभिनंदन केले.