मुंबई : शपथविधी होताच अॅक्शनमोड मध्ये असलेले (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकानाथ शिंदे हे सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Gadchiroli) गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. (flood situation) पूरस्थितीची पाहणी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना झाले आहेत. मुंबईहून नागपूर विमान तळावर त्यांचे आगमन होणार आहे. तर नागपूरातून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे जाणार आहेत. मुंबईतील बैठका बाजूला सारुन मुख्यमंत्री हे पूरग्रस्त भागात दाखल होत आहेत. एवढेच नाहीतर पाहणीनंतर ते जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी नांदेड आणि हिंगोली भागात अतिवृष्टी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी फोन करुन योग्य त्या सूचना दिल्या होत्या. दरम्यानच्या काळात ते दिल्ली दौऱ्यावर होते. पण गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसामध्ये वाढ होत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील नागरिकांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत. 3 वाजता ते मुंबईहून नागपूर विमानतळाकडे निघणार आहेत. तर 4 वाजता अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर सायंकाळी 6:30 वाजता गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले होते. आता तेच पालकमंत्री थेट मुख्यमंत्री म्हणून अतिवृष्टी आणि पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. मध्यंतरीच्या राजकीय नाट्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच शिंदे हे गडचिरोलीमध्ये दाखल होत आहेत. येथील भौगोलिक परस्थितीचा त्यांना अंदाज असला तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. काल झालेल्या आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपूरातही विविध विकास कामांचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता गडचिरोलीची स्थिती पाहून ते काय मदत करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यापुर्वी प्रत्यक्ष पाहणी आणि जिल्हा प्रशासनासोबतची बैठक ही महत्वाची राहणार आहे.