शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून या वक्तव्याप्रकरणात अरविंद सावंत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे.महिलांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निलम गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.दरम्यान आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
अरविंद सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महायुतीकडून अरविंद सावंत यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शायना एन. सी. यांच्याबाबत सावंत यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं.लाडक्या बहिणींबाबत असं वक्तव्य करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अरविंद सावंत यांनी शायना एन.सी. याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.“त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो” असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर स्पष्टीकरण देताना आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असं सावंत यांनी म्हटलं आहे.