जुले महिन्यातील अर्थसंकल्पामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा झाल्यानंतर दर महिन्याला 1500 च्या हिशोबाने पाच महिन्यांचे 7500 रुपये आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.मात्र सरकारने हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं गाजर असून विधानसभा निवडणुकानंतर ही योजना सुरू राहणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला घघवीत यश मिळालं असून मंत्रीमंडळाचा शपविधीही पार पडला असून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याचं काय असा सवाल अनेक महिलांच्या मनात होता. मात्र आता याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्या योजनादेखील आम्हाला चालवायच्या आहेत. या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्यांचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करत आहोत. कोणच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलं आहे. तोही सर्व खात्यात लवकर जमा होईल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीपुरतं हे योजनेचं आश्वासन न राहता यापुढेही ती योजना सुरूच राहणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत फडणवीसांनी या योजनेवरून टीका करणाऱ्यांनाही सुनावलं.
अदिती तटकरे यांनीही दिले होते अपडेट्स
कालच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत अपडेट्स दिले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार असल्याचे तटकरे यांनी नमूद केलं होतं. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट्स दिले .
‘ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.’ असे अदिती तटकरे यांनी म्हटले होते. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सिंडीग राहिलेल्या सुमारे १२,८७,५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली, असेही अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं.